महालक्ष्मी एक्स्प्रेस...माणसांनी ठचाठच भरलेली...मी मुंबईहून पुण्यापर्यंत निघाले होते...दिवसभर काम करून गाडीत जरा झोप घ्यायची असं ठरवलं होतं पण गाडीत गर्दी इतकी की बसायला मिळालं हीच गोष्ट फार वाटली.
जरा स्थिरस्थावर झाले, आजूबाजूला नजर टाकली...गर्दी जरा गावाकडची होती...म्हणजे शहरी नक्कीच नव्हती. माझ्यासारख्या दोन-चार मुंबईला चढलेल्या मुली होत्या पण बाकी सगळे बहुधा गावाकडे चालले होते. महिलांच्या डब्यात अर्थात मुलंही कोंबली होती. तीही जागा सापडवून खेळायचा प्रयत्न करत होती.
थोड्या वेळानं सगळ्यांनी खाणं-पिणं सुरू केलं. डबा इतका अस्वच्छ होता की घरी जाऊन फ्रेश झाल्यावरच जेऊ या विचाराशिवाय आणखी काही करता येणं अवघड होतं. खिडकीशी बसलेल्या बाईनं तिचा "डबा' उघडला. रुमालात बांधलेली भाकरीची थप्पी, त्यावरच भात, त्यावर भाजी आणि खर्डा...बाई जेवत होती, जेवायचं का असं तिनं मुलांना विचारलं आणि ती नाही म्हणल्यावर फार आग्रह केला नाही. अचानक तिच्या मुलानं रुमालातला भात मुठीत भरून घेतला आणि तो गाडीत सगळीकडे भात उडवायला लागला. गाडीतल्या सगळ्यांचेच चेहरे तुसडे झाले. त्याची आई त्याला काही बोलेना. मग गाडीतल्याच कोणीतरी त्या बाईलाही खडसावलं. तरी ती बाई फारसा रिस्पॉन्स देत नव्हती. शेवटी तिनं मुलाला दोन लगावल्या आणि खिडकीबाहेर बघत बसली.
शेजारणीनं तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं, की ती नवऱ्याला शोधायला मुंबईला आली होती. दोन मुलांना घेऊन...नवरा मुंबईला काम करतो इतकीच तिला माहिती...तो आत्तापर्यंत फक्त दोनदाच गावाला आला होता, आणि पदरात दोन मुलं टाकून गेला. सासरी हाकलून लावलं म्हणून ती नवऱ्याला शोधायला आली होती. तो मिळाला नाही, म्हणून गावाकडे जाणाऱ्या गाडीत बसली. सासरी तर जाताच येणार नव्हतं. त्यामुळे आता पुढे कुठे जावं याची विचार करत होती. मुलानं इतर प्रवाशांच्या अंगावर खरकटं उडवणं तिला दिसूनही दिसत नव्हतं.
तिचं ऐकून गाडीतले सगळे तुसडे चेहरे बदलले. गाववाले, शहरी...सगळेच...त्या बाईचा चेहरा अजून डोळ्यापुढे आहे माझ्या...मुलांना घेऊन आता उतरायचं कुठे आणि राहायचं कुठे आणि खायचं काय असे प्रश्न होते तिच्यापुढे...आणि आम्ही गाडीत कसं वागावं याचे धडे देत होतो तिला...
तेव्हा फार जाणवलं, की आपल्याला माणूस दिसतो त्याच्या पलीकडे कितीतरी अधिक असतो.
पटापट निष्कर्षप्रत यायची घाई असते ती आपल्याला...पण समोरच्याच्या वागण्याचा काही निराळा अर्थ असू शकतो, पेक्षा ते वागणं जरी "चुकीचं' असेल तरी त्यामागचं कारण मोठं असू शकतं याची जाणीव त्या दिवशी तीव्रतेनं झाली...आता कधीही, कोणीही, कसंही वागलं तरी, यामागे काहीतरी कारण असू शकेल हा शक्यतेचा एक टक्का मी कायम राखून ठेवते. त्यामुळे न्यायाधिशाच्या खुर्चीतून पायउतार होऊन परिस्थिती नितळपणानं बघण्यासाठी प्रयत्न करता येतो ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
Excellent. I appreciate.
Arvind
Totally agree chitra....
aatli aani baherchi manase vegli astaat...aata pratyekachya tala paryant jata yet nahi..pan lagech kadhi nikal devu naye...bharlele dole nehmi vahat nahit..bharleli mane sudhha bahrun kordepana dakhvitaat...
anubhav khara vatala...gud one..
चित्रा,
तुझ्या क्षेत्रात येणा-या धावपळीबरोबरच वेगवेगळ्या जिवंत कॅरॅक्टर्सना अचानक जे भेटणं होतं त्याने तुझ्यासारख्या संवेदनाशील मनांवर जे तरंग उमटतात, त्याची वलंयं या तुझ्या समुद्रात उमटताना पाहताना मजा येतेय.
मागे तुझा एकच ब्लॉग वाचला होता, अतुलशी बोलताना तुझ्या ब्लॉगचा पुन्हा विषय निघाला आणि ही नवीन वलयमालिका पाहिली. चालू ठेव.
अध्यात्मिक हाय म्हणजे काय ते मला त्यावेळेला कळलं नव्हतं आता कळतंय. काळजी घे.
माझ्या ब्लॉगवरून तुझ्या ब्लॉगला लिंक देतो, चालेल ना...
"तेव्हा फार जाणवलं, की आपल्याला माणूस दिसतो त्याच्या पलीकडे कितीतरी अधिक असतो.
पटापट निष्कर्षप्रत यायची घाई असते ती आपल्याला..."....
किती खरंय हे! फार उपयुक्त अनुभव कथन केलाय तुम्ही! धन्यवाद!
Post a Comment